Friday, January 15, 2021

Daizy - our lovely dog

डेझी (20 मार्च 2020)


सकाळी प्रियाचा आम्हा सतरा जणांच्या ग्रुपवर मेसेज आला की आज पहाटे कधीतरी डेझी गेली. प्रशांतच्या बंगल्यावर (सदांजना) असायची ती. बारा वर्षे जगली. तिला बहुदा मरण यातना झाल्या नसाव्यात. शेवटचे दोन दिवस तिने खाणे जवळपास बंद केले होते. खुप आनंद दिला तिने आम्हा साऱ्यांना. मातृत्व देखील उपभोगलं तिने. जर्मन शेफर्ड जातीची होती. उंचीपूरी, धिप्पाड असल्यामुळे त्यांच्या कॉलनीत तिचा खूप दरारा होता. विधींसाठी ती बंगल्याच्या बाहेर पडली की बाकी सारी श्वान मंडळी अक्षरशः शेपूट घालून पळून तरी जायची किंवा कंपाउंडच्या भिंतीला लगटून उभी राहायची. ही मात्र त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहता लांब कोपऱ्यात जाऊन विधी उरकून यायची. बहुदा तिला माणसे बरोबर समजायची. कांही जणांना आधी कधीही न पाहता देखील ती त्यांच्याशी प्रेमाने वागायची. आणि आधी भरपूर वेळा येऊन गेलेल्या कांही जणांवर खूपच भुंकायची. एकदा पोस्टमनला तिने प्रसाद दिला होता. एकदा प्रशांतकडे कुणी आलं होतं. ती व्यक्ती बहुदा डेझीला आवडली नव्हती. प्रशांत त्यांच्याशी बोलत असताना डेझी प्रशांतच्या पायाशी बसली होती. बोलता बोलता त्या व्यक्तीने डेझीला हात लावायचा प्रयत्न केला. डेझीने त्याच्यावर झेप घेऊन त्याच्या छातीवर पाय ठेवले. प्रशांतने चपळाई करून तिला आवरले. अन्यथा काय झाले असते याची कल्पना करवत नाही.
तिला खाली पार्किंग मध्ये एक लोखंडी जाळीचं प्रशस्त घर बनवलेलं होतं. त्यात ती पहुडलेली असायची. आमच्यापैकी कोणी तिथे गेले की तिच्या बाल आणि तरुणपणी ती तिच्या केजमधून लडीवाळपणे आरडाओरडा करीत असे. तिला बाहेर घेऊन प्रेमाने गोंजारल्याशिवाय तिचा आरडाओरडा थांबतच नसे. गेल्या दोन वर्षात हा अवखळपणा लोप पावला होता. प्रौढत्व (म्हातारपण?) आलं होतं बहुदा. ती आई झाली तेंव्हा सुरुवातीचे कांही दिवस ती कोणालाही तिच्या पिलांजवळ येऊ द्यायची नाही. फक्त आरती, प्रशांतची सौभाग्यवती, तिच्याजवळ जाऊ शकत होती. आईचीच माया लावली होती ना आरतीने डेझीवर. 
आम्ही सारे जमलो की डेझी उत्सवमूर्ती असायची. सगळ्यांचे लक्ष डेझीकडेच असायचे. बऱ्याचदा प्रशांत म्हणायचा देखील की या घरात डेझी शिवाय आम्ही देखील राहतो. आमच्याकडे देखील पहा ना.😊
आम्हा भावंडांची सारी मुले सदांजना मध्ये जमली की डेझीचा तिच्या पिंजऱ्यामधून आरडाओरडा चालू व्हायचा. तिला तेथून काढून जोपर्यंत ती साऱ्या मुलांच्या मधोमध येऊन बसेपर्यंत तो चालूच असायचा. तिथे ती निवांतपणे बसून असायची. मुले तिच्या अंगावरच पत्त्याचा डाव खेळायची. 
हिची पिले जेंव्हा दुसऱ्यांना दिली तिची काय भावना झाली असेल यावर मुलांनी चर्चा केली होती.
रविवारी तिची मेजवानी असायची. सुरेश (प्रशांतकडे काम करतो) तिला सकाळी टेरेसवर घेऊन जायचा. तेथे तिची मेजवानी आणि आंघोळ व्हायची. मग दुपार ते संध्याकाळपर्यन्त बाईसाहेब एकदम सुस्त असायच्या. इतर दिवशी ती एकदम शाकाहारी राहायची. आम्ही सारे जे खायचो ते सारे तिला हवे असायचे. आंबा, द्राक्ष, कलिंगड, शेंगदाणे, सगळे चालायचे तिला. टोमॅटो तर जास्तच आवडते होते तिचे. प्रशांत, आरती, पार्थ आणि प्रिया हे तर तिचे खूपच प्रिय. ते जर दोन तीन दिवसांनी घरी आले तर तिच्या आनंदाला पारावर नसायचा. आमच्या आईशी ती आधी आधी अवखळपणे वागायची. नंतर तिला बहुदा लक्षात आले की आईला हे असले अवखळ वागणे झेपत नाही. मग ती आईशी सौम्यपणे वागू लागली.
घरातील एक महत्वाची व्यक्ती गेल्याची भावना आम्हा साऱ्यांचीच झाली आहे. मुलांना इतकं भावणावश झालेलं या आधी पाहिल्याचं स्मरत नाही.
डेझीकडे आमच्यासाठी फक्त प्रेम आणि प्रेमच होतं. ते देखील निरपेक्ष...😢😢

श्रद्धांजली 🙏🙏🙏

✍️ मिलिंद देशपांडे

Saturday, July 11, 2020

आमची सिंहगड ट्रिप

कालावधी : 1983 ते 1985 दरम्यान कधीतरी


बजाज ऑटो मध्ये नोकरी करीत असताना मी सदाशिव पेठेतील हत्ती गणपती जवळ असलेल्या दुर्गा लॉज (1212, सदाशिव पेठ) येथे मासिक भाडे देऊन रहात होतो. एका रूम मध्ये दोघेजण राहायचे. रूम मोठी असेल तर तीन. 
इमारतीच्या आवारात भरपूर मोकळी जागा होती. नारळाची तीन चार झाडे होती. अधून मधून नारळ खाली पडायचे. पण कधी कुणाचा कपाळमोक्ष झाल्याचं आठवत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालक त्या इमारतीत रहात नव्हता. भाडेवसुली बहुदा तेथे राहणारा मालकाचा नातेवाईकच करायचा. त्यामुळे बऱ्यापैकी स्वातंत्र्य होतं. मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे साऱ्यांच्या सोयीचं होतं. त्यामुळे मित्र परिवाराचा नेहमी राबता राहायचा.
त्यावेळी विजमंडळाच्या निर्णयामुळे पिंपरी चिंचवड मध्ये साप्ताहिक सुट्टी गुरुवारी असायची. बुधवारी आम्ही पांच सहा देगलूरकर (गाववाले) मित्र दुर्गा लॉज वर जमायचो. आणि एकतर गप्पा मारीत बसायचो, नाहीतर सारसबाग किंवा तत्सम कुठेतरी चक्कर मारून यायचो. कधीतरी कुठलासा सिनेमा पाहून यायचो.
असेच एका बुधवारी आम्ही जमलो असता, कुणीतरी म्हटलं की दरवेळी तेचतेच काय करायचं. आज कुछ तो तुफानी करते है। मग बरीच चर्चा होऊन रात्री सायकल वर सिंहगडावर जायचं ठरलं.
सगळ्यांनी जेवण आटपून घेतलं. मग रामनाथ मिसळ च्या बाजूला असलेल्या सायकलच्या दुकानातून सायकल्स भाड्याने घेतल्या. साधारण रात्री आठ वाजता मार्गक्रमण सुरू केले. दांडेकर पूल ओलांडला आणि रहदारी कमी कमी होत गेली. विठ्ठल मंदिर ओलांडल्यानंतर तर रस्त्यावर एकदम शुकशुकाट होता. आम्ही मजेत सायकल्स हाकीत होतो. मोठ्यामोठ्यांदा गप्पा मारत होतो, गाणी गात होतो. कुणाच्या तरी डोक्यातून आल्यामुळे मग मंगलाष्टक म्हणण्याची स्पर्धा चालू झाली. एकदाचे सिंहगड पायथ्याला पोंचलो. रात्रीचे दहा साडेदहा झाले असावेत. आधीच ठरल्याप्रमाणे पायथ्याला असलेल्या एका हॉटेल कम घरातल्यांना कडी वाजवून जागे केले. त्यांना सांगितले की आमच्या सायकल्स ठेवा. आम्ही आता गड चढून जात आहोत. सकाळी परतून सायकल्स घेऊन जाऊ. तो आमच्याकडे पहातच राहिला. आम्हाला वाटलं की तो सायकल्स ठेऊन घेणार नाही. पण तो म्हणाला, तुम्हाला काय वेड तर लागलं नाही ना? आज अमावस्या आहे. आता भुताखेताचं, विंचूकाट्याचं कुठं गडावर जाता?

 हे ऐकताच मात्र आमची घाबरगुंडी उडाली. सगळे एकमेकांकडे पाहू लागलो. मग अवसान आणून चर्चा केली. नंतर टॉस केला. गडावर जाण्यासाठीचा कौल मिळाला. मग काय, निघालो गड चढत. त्यावेळी मोबाईल नव्हते. बहुदा आमच्याकडे दोन टॉर्च असावेत. त्या अपुऱ्या प्रकाशात आम्ही त्या अमावस्येच्या रात्री गड चढायला सुरुवात केली. कितीही उसनं अवसान आणलं असलं तरी सगळे घाबरलो होतो. मधेच कांही बारीकसा आवाज जरी झाला की एकमेकांचा आधार घेत होतो. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे चढावरील माती मोकळी झाली होती. त्यामुळे पायाखालची माती निसटत होती.
कसेबसे एकदाचे दोन अडीच तासात गडावर पोंचलो. मध्यरात्र उलटून गेली होती. गडावरील मंदिरात झोपलो. सकाळी उठून गडावरील दही आणि झुणका भाकरी खाऊन गड उतरून पायथ्याला आलो. पार्किंगचे पैसे देऊन सायकल्स ताब्यात घेतल्या. आणि पुण्याला परतलो.


Wednesday, July 8, 2020

आठवणी भूतकाळातील - 1

लहानपणी आमचे कुटुंब एक मोठे कुटुंब होते. आजोबा, आजी, त्यांची तीन मुले, त्यांच्या बायका आणि आम्ही सहा मुले आणि पांच मुली. त्यावेळच्या आठवणी नंतर कधीतरी. ही आठवण माझ्या पहिल्या पुणे प्रवासाची. 

पहिल्यांदा पुण्यात आलो तो 1979 साली माझ्या काकांसोबत (सुभाष काका). हिंदुस्थान अँटिबायोटिक लिमिटेड येथे apprenticeship करण्यासाठी माझी निवड झाली होती. येताना देगलूरहुन लातूरला आलो. तेथे मामांच्या घरी राहिलो. त्यावेळच्या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे चुलत भावाचे मामाचं गांवदेखील आपलं आजोळ असायचं. माझं आजोळ बासर. एका काकूचं माहेर औराद आणि बिदर, तीचे काका लातूरला रहात म्हणून तेदेखील तिचे माहेर. दुसरी एक काकूचे माहेर टाकळी (लातूर जवळील). त्यामुळे ही सगळी गांवे आमची आजोळं होती.
देगलूर, म्हणजे माझे गांव, येथून मी आणि काका लातूरला पोहोंचलो. त्यादिवशी तेथे इंदिरा गांधी यांची सभा होती. त्या सभेला जाऊन आलो. तेथून मग सायंकाळी कधीतरी (बहुदा बसने) कुर्डुवाडीला पोंचलो.

तेथून रेल्वेने आम्ही रात्रीचा प्रवास करून पुण्याला पोहोंचलो. सकाळी रेल्वेतच ब्रेड आम्लेट खाल्ले. हा माझ्या आयुष्यातील पहिला मांसाहार. तोदेखील काकांच्या साक्षीने. 😊 













पुण्यात जंगली महाराज रस्त्यावरील पाताळेश्वर समोरील राज लॉज येथे उतरलो. पाताळेश्वर  आणि जंगली महाराज मंदिर पाहून झाले. डेक्कन जिमखाना येथील नटराज सिनेमा गृहात मिस्टर नटवरलाल हा सिनेमा पाहिला.
नटराजची भव्यता पाहून दिपून गेलो होतो. नंतर जेंव्हा पुण्यात राहायला लागलो तेंव्हा त्याचं कांही फारसं वाटेनासं झालं. देगलूरला दोन सिनेमागृहे होती, पिरोजदिन आणि व्यंकटेश. दोन्हीचे मालक सावकशा हे माझ्या वडिलांचे मित्र होते. त्यामुळे कधी तिकीट काढून सिनेमाला गेल्याचे आठवत नाही. सिनेमाला जाणे हा एक सोहळा असायचा. आधी आईला विनवण्या करायच्या. बाबांना विनंती करण्याचं धाडस व्हायचं नाही. आईकडून बऱ्याचदा विनंती नामंजुरच व्हायची. पण जेव्हा ती मान्य करायची तेंव्हा मॅनेजर काकांना जाऊन सांगायचं. जर सिनेमा हाऊसफुल असेल तर ते सांगायचे की मी तुम्हाला कधी यायचं ते सांगेन. मग सिनेमाची गर्दी कमी झाली की ते निरोप पाठवायचे. मग संध्याकाळी लवकर जेवण करून आईसोबत आम्ही सारी बालगोपाळ मंडळी सिनेमाला जायचो. कधी कधी एखादी काकू असायची. तेथे आमच्यासाठी बॉक्स केबिन राखीव असायची. त्यात फक्त आम्ही कुटुंबीय असायचो. मध्यंतरात आम्ही बाहेर जात नव्हतो. सिनेमा संपला की मग सारे चालतच घरी परतायचो. देगलूर सारखा नांदेड जिल्ह्यातील दुर्लक्षित तालुका. कितीसा मोठा असणार. दहा मिनिटात घरी पोचायचो.
या माझ्या पहिल्या पुणे प्रवासाआधी पुण्याचे कौतुकच  ऐकले होते. लहानपणी कधीतरी आई बाबांचा हात धरून हैदराबाद, तिरुपती, नांदेड हीच मोठी गांवे पाहिलेला मी. त्यामुळे माझ्यासाठी पुणे म्हणजे जगातील सर्वांगसुंदर शहर होतं. विस्मयचकित नजरेने आजूबाजूला पहात होतो. मुंबई-पुणे हायवे आणि त्यावरील वाहतूक पाहून माझे डोळेच विस्फारले होते. तरी बरं ते 1979 च होते. काकांच्या परिचयाचे एकजण HAL मध्ये नोकरी करीत होते.

ते HAL च्या कॉलनी मधेच रहात होते. आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांच्या आग्रहामुळे त्यांच्याकडेच जेवण केलं. त्यांच्याशी चर्चा करून काकांनी मी HAL मध्ये apprenticeship करू नये हे ठरवले. मग आम्ही पुण्याहून देगलूरला परत आलो. परतीचा प्रवास कांही आठवत नाही. कारण देगलूरला परत जाणे हे कांही रोमांचक नव्हते. अर्थात त्यावेळी. आज ते खूप रोमांचक आहे.
अशाप्रकारे माझी पहिली पुणे ट्रीप सफळ (?) संपूर्ण झाली.

✍️ मिलिंद देशपांडे