पहिल्यांदा पुण्यात आलो तो 1979 साली माझ्या काकांसोबत (सुभाष काका). हिंदुस्थान अँटिबायोटिक लिमिटेड येथे apprenticeship करण्यासाठी माझी निवड झाली होती. येताना देगलूरहुन लातूरला आलो. तेथे मामांच्या घरी राहिलो. त्यावेळच्या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे चुलत भावाचे मामाचं गांवदेखील आपलं आजोळ असायचं. माझं आजोळ बासर. एका काकूचं माहेर औराद आणि बिदर, तीचे काका लातूरला रहात म्हणून तेदेखील तिचे माहेर. दुसरी एक काकूचे माहेर टाकळी (लातूर जवळील). त्यामुळे ही सगळी गांवे आमची आजोळं होती.
देगलूर, म्हणजे माझे गांव, येथून मी आणि काका लातूरला पोहोंचलो. त्यादिवशी तेथे इंदिरा गांधी यांची सभा होती. त्या सभेला जाऊन आलो. तेथून मग सायंकाळी कधीतरी (बहुदा बसने) कुर्डुवाडीला पोंचलो.
तेथून रेल्वेने आम्ही रात्रीचा प्रवास करून पुण्याला पोहोंचलो. सकाळी रेल्वेतच ब्रेड आम्लेट खाल्ले. हा माझ्या आयुष्यातील पहिला मांसाहार. तोदेखील काकांच्या साक्षीने. 😊
तेथून रेल्वेने आम्ही रात्रीचा प्रवास करून पुण्याला पोहोंचलो. सकाळी रेल्वेतच ब्रेड आम्लेट खाल्ले. हा माझ्या आयुष्यातील पहिला मांसाहार. तोदेखील काकांच्या साक्षीने. 😊
पुण्यात जंगली महाराज रस्त्यावरील पाताळेश्वर समोरील राज लॉज येथे उतरलो. पाताळेश्वर आणि जंगली महाराज मंदिर पाहून झाले. डेक्कन जिमखाना येथील नटराज सिनेमा गृहात मिस्टर नटवरलाल हा सिनेमा पाहिला. नटराजची भव्यता पाहून दिपून गेलो होतो. नंतर जेंव्हा पुण्यात राहायला लागलो तेंव्हा त्याचं कांही फारसं वाटेनासं झालं. देगलूरला दोन सिनेमागृहे होती, पिरोजदिन आणि व्यंकटेश. दोन्हीचे मालक सावकशा हे माझ्या वडिलांचे मित्र होते. त्यामुळे कधी तिकीट काढून सिनेमाला गेल्याचे आठवत नाही. सिनेमाला जाणे हा एक सोहळा असायचा. आधी आईला विनवण्या करायच्या. बाबांना विनंती करण्याचं धाडस व्हायचं नाही. आईकडून बऱ्याचदा विनंती नामंजुरच व्हायची. पण जेव्हा ती मान्य करायची तेंव्हा मॅनेजर काकांना जाऊन सांगायचं. जर सिनेमा हाऊसफुल असेल तर ते सांगायचे की मी तुम्हाला कधी यायचं ते सांगेन. मग सिनेमाची गर्दी कमी झाली की ते निरोप पाठवायचे. मग संध्याकाळी लवकर जेवण करून आईसोबत आम्ही सारी बालगोपाळ मंडळी सिनेमाला जायचो. कधी कधी एखादी काकू असायची. तेथे आमच्यासाठी बॉक्स केबिन राखीव असायची. त्यात फक्त आम्ही कुटुंबीय असायचो. मध्यंतरात आम्ही बाहेर जात नव्हतो. सिनेमा संपला की मग सारे चालतच घरी परतायचो. देगलूर सारखा नांदेड जिल्ह्यातील दुर्लक्षित तालुका. कितीसा मोठा असणार. दहा मिनिटात घरी पोचायचो.
या माझ्या पहिल्या पुणे प्रवासाआधी पुण्याचे कौतुकच ऐकले होते. लहानपणी कधीतरी आई बाबांचा हात धरून हैदराबाद, तिरुपती, नांदेड हीच मोठी गांवे पाहिलेला मी. त्यामुळे माझ्यासाठी पुणे म्हणजे जगातील सर्वांगसुंदर शहर होतं. विस्मयचकित नजरेने आजूबाजूला पहात होतो. मुंबई-पुणे हायवे आणि त्यावरील वाहतूक पाहून माझे डोळेच विस्फारले होते. तरी बरं ते 1979 च होते. काकांच्या परिचयाचे एकजण HAL मध्ये नोकरी करीत होते.
ते HAL च्या कॉलनी मधेच रहात होते. आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांच्या आग्रहामुळे त्यांच्याकडेच जेवण केलं. त्यांच्याशी चर्चा करून काकांनी मी HAL मध्ये apprenticeship करू नये हे ठरवले. मग आम्ही पुण्याहून देगलूरला परत आलो. परतीचा प्रवास कांही आठवत नाही. कारण देगलूरला परत जाणे हे कांही रोमांचक नव्हते. अर्थात त्यावेळी. आज ते खूप रोमांचक आहे.

अशाप्रकारे माझी पहिली पुणे ट्रीप सफळ (?) संपूर्ण झाली.
✍️ मिलिंद देशपांडे